पार्श्वभूमी
भामटी ही मूळची सैनिक जमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापणेत इतर विमुक्त भटक्य जमाती प्रमाणे भामटी जमातीचेही मोठे योगदान आहे. त्यासाठी ते सैनिक म्हणून लढले. व त्यांची ही कामगिरी उत्तर पेशवाई पर्यंत सुरू होती. असे रसेल व हिरालाल आपल्या ग्रंथात म्हणतात,हा समाज राजपूत वंशाचा, राजस्थानातील भामट प्रांतातून तो महाराष्ट्रात आला म्हणून त्या लोक समूहाला भामटी असे नाव पडले. असे गायकवाड आपल्या स्वकळानात म्हणतात. त्यात तथ्य असू शकते. राजपूत राजांकडे सैनिकी करीत असतांना अकबराच्या आक्रमणामुळे अनेक सैनिक जमाती पोटासाठी महाराष्ट्रात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वजही आले त्यांच्या सोबत भामटी व इतर सैनिक जमातीही आल्या . अनेक मराठ्यांनी मुस्लीम सत्तेची चाकरी पत्करली. छ. शिवाजी महाराज मात्र आपले मावळे व भटक्या सैनिक टोळ्यांना घेवून स्वराज्य निर्माणास सज्ज झाले. त्यासाठी भामटी जमातींनीही मोलाचे योगदान दिले. पण राजपुताच्या सारखे पुढे मराठा राज्यही बुडाले. इंग्रजी अंमल सुरू झाला आणि भामटी समाजाच्या नशिबी भटकंतीचे जीवन आले.
जुलमी कायदा
१८७१ च्या गुन्हेगार जमातींच्या जुलमी कायद्या नुसार भटक्यांची धरपकड सुरू झाली. त्यांच्यावर चोरीचे दरोडेखोरीचे आरोप लावले गेले. एकूण बावन्न सेटलमेंट बांधून त्या खुल्या तुरूंगात भटक्यांना डांबल्या जावू लागले. त्यात जे खरेखूरे चोर होते ते तर डांबले गेलेच, पणज्यांनी कधीच चोरी केली नाही असे बेकसुर लोकही कुटुंबासह डांबल्या गेले. त्यांना नीयमीत पोलिसठाण्यात हजेरी दयावी लागायची. गाव पाटील कोतवाल यांचा ससेमिरा मागे होताच. या साऱ्या छळाला वळसा देत भामटी जमात साऱ्या भारतभर विखूरली.व काल परत्वे जिथल्या तिथेच स्थायिक झाली. दळण वळणाच्या साधनांचा अभाव, इंग्रजी शासनाची भीती वाढत जाणार एकमेकांतील अंतर यामुळे दुरावा निर्माण होवून त्यांच्यात उच्च नीचतेच्या तटबंद्या तयार झाल्या. नव नव्या जाती, पोटजाती उदयास आल्या परस्परातच चातुर्वण्य निर्माण झालं व त्यांच्यातील एकसंघता रसातळाला गेली.
समाज जागृतीची गरज
भामटी समाजातील सर्वच टोळ्यांत कमी अधिक प्रमाणात शिकली सवरली मुलं मुली आहेत पण ती आपल्यातच गुंग आहेत. समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी काहीतरी धडपड करण्याची त्यांची प्रवृत्ती दिसत नाही. ज्यांच्यात ती आहे त्यांना इतरांचे सहकार्य नाही. परिणामी समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न शिवधनुष्य मोडण्या सारखे आहे. तरीही आपण सारे एकत्रित यावे. पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा विचार करुन त्यांच्यासाठी मार्ग निष्कटक करावा त्या दृष्टीने विचार विनिमय व्हावा म्हणून आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे.